सायकल ट्रॅकचा वापरच खुंटला?

हडपसर परिसरातील स्थिती; अतिक्रमण, पार्किंगसाठी सर्रास वापर

– विवेकानंद काटमोरे

हडपसर – सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता रुंदीकरणात उभारलेले सायकल ट्रॅक हडपसरमध्ये कागदावरच उरले आहेत. बहुतांशी ट्रॅक नादुरुस्त असून अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर पार्किंग व अतिक्रमणांचा विळखा दिसत आहे.

बीआरटी मार्गावरील फातिमानगर चौक ते गांधी चौक दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही त्या निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावरील हा सहा ते सात किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. येथील सायकल ट्रक नावापुरता राहिला असून दुचाकी वाहने सर्रासपणे येथून जाताना दिसतात. तसेच, वाहन विक्रेत्यांनी या ट्रॅकवर दुकाने थाटली आहेत. येथील पादचारी मार्गावर तसेच सायकल ट्रकवर केबल कंडेन्सर उघडे पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जाताना धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर बसथांबे रस्त्याच्या मधोमधच असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

मेगा सेंटर व अण्णासाहेब मगर रुग्णालयाकडे जाणारी चारचाकी व दुचाकी वाहने येथील बीआरटी मार्गावरील सायकल ट्रक व पादचारी मार्गावरूनच जातात. या वाहनांना ये-जा करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने आम्ही जायचे कुठून असा प्रश्‍न वाहनचालक उपस्थित करीत आहेत. यासंबंधीचे नियोजन प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

फातिमानगर चौक ते गांधी चौकापर्यंत सायकल ट्रक, पादचारी मार्ग तसेच रस्त्याच्या मधोमध मोठा दुभाजक असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या अरुंद रस्त्यातून मार्ग काढण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहने येथील सायकल ट्रॅक वरून जातात तर सायकल चालक पादचारी मार्गावरून जात असल्याचा विरोधाभास येथे पहायला मिळतो. येथे अनेक वेळा पादचाऱ्यांना व सायकल चालकांना वाहनांची धडक बसल्याने अनेक नागरीक जखमी झाले आहेत, तसेच काहींचा मृत्युही झाला आहे.

सायकल ट्रॅकचा खर्च वाया…
माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर यांनी कोरिया देशाच्या धर्तीवर सायकलसाठी स्वतंत्र अशी मार्गिका असलेला एक किलोमीटरवर सायकल ट्रॅक केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सायकल ट्रॅकवर सायकल चालवून त्यांचे उद्‌घाटन केले होते. मात्र, सायकल ट्रॅकवर वाहनांचे अनधिकृत पार्किंग झाल्याने मूळ उद्देश बाजूला पडून हा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे.

हडपसर परिसरात सायकलवरून शाळेत ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे भेकराईनगर नगर कमान ते गाडीतळ कालवा, असा एक ते दीड किलोमीटर एक चांगल्या दर्जाचा सायकल ट्रॅकवर तयार केला होता; परंतु त्यावर वाहनांचे अनाधिकृत होणारे पार्किंग तसेच अवजड वाहने जात असल्याने त्याला खड्डे पडले आहेत. वाहनांवर कारवाई करण्याबाबत हडपसर वाहतूक विभागास वारंवार सांगितले आहे. काही ठिकाणी ट्रॅकवरील रंग गेला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच करण्यात येणार आहे.
– वैशाली बनकर, नगरसेविका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.