वॉशिंग्टन: औषधांच्या निर्यातील कोणत्याही देशांनी बंदी घालू नये, अशी सूचना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सर्व देशांना केली आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी सारे जग आज त्रस्त असताना औषधांचा तुटवडा हा जीवघेणा ठरू शकतो म्हणून कोणत्याही देशाने आपल्याकडील औषधांची साठेबाजी करणे टाळावे आणि त्यांच्या निर्यातीला प्रतिबंध घालण्याचेही टाळावे अशी सूचना नाणेनिधीकडून आली आहे.
नाणेनिधीच्या मुख्य आर्थिक तज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे की, औषध पुरवठ्याबाबत जगभर सर्वत्र उत्तम सहकार्य असले पाहिजे आणि त्यात समजूतदारपणा दाखवण्याची हीच वेळ आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची निर्यात रोखण्याची ही वेळ नाही.
ग्लोबलायझेशनमुळे आपण जे कमावले आहे ते ओैषध पुरवठ्याच्या बाबतीतील आपल्या भूमिकांमुळे आपण गमावता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. जगातल्या विविध औषध उत्पादन तसेच वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादन कंपन्यांनी आपली उत्त्पादने केवळ देशांतर्गत वापरासाठीच उपलब्ध असतील अशी भूमिका घेतल्याने अनेक ठिकाणी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. इटालीच्या एका नामांकित व्हेंटिलेटर उत्पादक कंपनीनेही अशीच भूमिका घेतली आहे.