पॅरिस – करोना परिस्थिती हाताळण्यात भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनीच भारताविषयी नकारात्मक बातम्यांचा सूर छेडला आहे. लसींच्या तुटवड्यावरूनही देशाला टीकेचे लक्ष्य केले जाते आहे. पण, इतर कोणीही भारताला काहीही शिकवण्याची गरज नसल्याचे म्हणत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतातून इतर राष्ट्रांना दिलेल्या लसींच्या मदतीची आठवण करून दिली.
लसींच्या पुरवठ्याच्या बाबतीत भारताला कोणीही काही शिकवणुकीचे धडे ऐकवण्याची गरज नाही. भारताकडून (लसींच्या रुपात) इतर राष्ट्रांना मानवतेच्या नात्याने मदत करण्यात आली. सध्या हा देश कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहे, हे आपण सर्वजण जाणतो असे राष्ट्राध्यक्ष इम्युन्यूएल मॅक्रो यांनी म्हटले आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या या परिषदेला जर्मनीच्या अँजेला मार्केल यांच्यासह इतरही दिग्गज प्रतिनिधींची उपस्थिती होती.
विकसित देशांकडून इतर राष्ट्रांच्या वाटेने जाणाऱ्या लसींच्या पुरवठ्यात अडथळे आणले गेल्याचे म्हणत या देशांनी इतर देशांना लस देण्यासाठी प्राधान्य देणे अपेक्षित होते, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विकसित देशांना फटकारले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पुन्हा एकदा महत्त्वाच्या मार्गाने साऱ्या जगाचीच मदत केली. शेजारी आणि इतर विकसनशील राष्ट्रांना लसींचा पुरवठा करण्यासोबतच काही राष्ट्रांना करोना प्रतिबंधात्मक लस मोफतही उपलब्ध करुन दिली. सारं जग करोनाच्या भयावह संकटाशी लढा देत असताना भारताकडून वॅक्सिन मैत्री या उपक्रमाअंतर्गत जवळपास 95 देशांना मदतीचा हात देण्यात आला आहे.