अन्नु मलिक बॉलिवुडमधील एक प्रस्थापित नाव आहे. चांगला संगितकार, गायक म्हणून त्याला ओळखले जाते. तसेच टीव्हीवरच्या रिऍलीटी शोमध्येही तो जज म्हणून असतो. त्यामुळे त्याचा चेहरा घराघरात पोहोचला आहे. मात्र अन्नुवर पूर्वीपासूनच एक आरोप होत आला आहे. तो म्युझिक चोरतो असे कायम म्हटले गेले आहे.
मराठीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने तर त्याची तुलना भुरट्या चोराशी केली होती. असो. तो भाग वेगळा. मात्र अन्नुला या आरोपांचा सामना अगदी सुरूवातीपासूनच करावा लागला आहे.
आता 2017 मधील त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याला रघु रामने हाच प्रश्न विचारला आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कोणती धून चोरली आहे का, असा तो सवाल होता. त्यावर अन्नु अर्थातच भडकला. मात्र रागाच्या भरात त्याने जे उत्तर दिले ते अंतर्मुख करणारे आहे.
मला कल्पना नव्हती, तु मला हा प्रश्न विचारणार आहे. तुझी जीभ फार मोठी झाली आहे अशा शब्दांत अन्नुने उत्तर देण्यास सुरूवात केली आणि पुढे शब्दांची लडच लावली. तो रघु रामला म्हणाला की तुझ्या अगोदर 11 पत्रकारांनी मला हाच प्रश्न विचारला आहे.
मग तुम्ही त्यांचा प्रश्न चोरला असे मी म्हणू का? मुळात या जगात एक देव सोडला तर बाकी कोणीच ओरिजनल नाही. हीच वस्तुस्थिती आहे. तु बॉर्डरचे संगित ऐकले का,एलओसीचे ऐकले का… ओरिजनल आहेत.
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे मला. उधारच्या टांग्याने मी इतका प्रदीर्घ काळ बॉलिवुडमध्ये प्रवास केला नसता असे सुनावतानाच त्याने त्याची गाजलेली गाणीही ऐकवली. अन्नुच्या या उत्तराला उपस्थितांनी टाळ्या देत दाद दिली. त्याचे संगित ओरिजनल असेल किंवा नसेलही.
मात्र आज बॉलिवुडमध्ये केवळ उचलाउचली चालली आहे हे कोणी नाकारू शकत नाही. परदेशातील चित्रपट नाही मिळाले तर आपलेच इतर भाषांमध्ये चित्रपट उचलून दाखवले जातात. फ्रेम टू फ्रेम कॉपी केली जाते. यात काय ओरिजनल असते? अन्नु म्हणतो तेच योग्य. एक देव सोडला तर कोणीच ओरिजनल नाही.