मुख्यमंत्री फडणवीस यांची मुश्रीफांवर अप्रत्यक्ष टिका
कोल्हापूर- म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कागल मतदारसंघातून आज प्रत्यक्षपणे विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. घाटगे यांचे वडील विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी समरजीत यांनी आज कागलमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागल मार्गावर समरजीत घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक उभा केले होते. याच फलकांमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा “परमनंट आमदार’ अशा आशयाचे फलक उभा करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या फलकावरून मुख्यमंत्र्यांनीही आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर चांगलीच टीका केली.
फडणवीस म्हणाले, जनतेने एकदा मनात आणले तर कोणीही परमनंट होऊ शकत नाही. जो जनतेची दिशाभूल करतो त्याला जनता घरी बसल्याशिवाय राहत नाही, अशा शब्दांत त्यांनी मुश्रीफ यांना फटकारले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटीलसुद्धा अप्रत्यक्षपणे समरजीत घाटगे युतीचे उमेदवार असल्याचे घोषित केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर कागल तालुक्यामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. खरंतर कागल तालुक्याला राजकारणाचं विद्यापीठ म्हंटल जाते. राजकारणाच्या याच विद्यापीठात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टिकेनंतर कागल मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहे.