पाणीपट्टीची थकबाकी भरल्याशिवाय दाखले न देण्याच्या सूचना
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेला कळविले
शिवणे, उत्तमनगर गावांमधील नागरिकांनी पाणीपट्टी थकविली
पुणे – महापालिकेत समाविष्ट 11 गावांपैकी शिवणे व उत्तमनगर या गावांमधील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपट्टी मोठया प्रमाणात थकविली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्राधिकरणाकडून नोटीस बजावूनही बिले भरण्यास नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे पाणीपट्टी भरल्याचे प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय या गावांतील नागरिकांना महापालिकेचा कोणत्याही प्रकारचे दाखले देण्यात येऊ नये असे प्राधिकरणाकडून महापालिकेला कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे व कोंढवे-धावडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे व न्यू कोपरे या चार गावांना पाणीपुरवठा होतो. यामधील शिवणे व उत्तमनगर या दोन गावांचा साधारण दीड वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र, या दोन गावांमधील नागरिकांकडे प्राधिकरणाच्या पाणीपट्टीची सुमारे सहा कोटींची प्रमाणात थकबाकी आहे.
ही पाणीपट्टीची थकबाकी वसूल होण्यासाठी पालिकेकडून जे मिळकत दाखला, उत्पन्नाचा दाखला, ना हरकत प्रमाणपत्र असे विविध प्रकारचे दाखले दिले जातात. असे दाखले देण्यापूर्वी प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करावे, अशी विनंती प्राधिकरणाचे उप विभागीय अभियंत्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून अद्याप याबाबत काही निर्णय घेतलेला नसल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
आधी थकबाकी वसूल करा…
ही गावे महापालिकेत आल्यानंतर पालिकेकडून प्राधिकरणास पत्र पाठवून ही 2 गावे पालिकेत आली असून उर्वरीत 2 गावेही भविष्यात पालिकेत येणार आहेत. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना पालिकेस हस्तांतरीत करण्याची मागणी केली होती. मात्र, पालिकेने या गावांची थकबाकी भरावी आणि नंतर ती गावांकडून वसूल करावी अशी भूमिका प्राधिकरणाने घेतली होती. त्यामुळे पालिकेनेनंतर ही योजना ताब्यात घेण्याकडे दुर्लक्ष केले होते.