मुंबई – मुंबईत करोनाचा शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण मायानगरी आणि उपनगरंही याच विषाणूच्या विळख्यात आली. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळे हा परिसर करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला.
पण, पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानाने आणि अर्थातच नागरिकांच्या सहकार्याने धारावीने करोनाशी लढा दिला आणि खऱ्या अर्थाने बऱ्याच अंशी हा लढा यशस्वीही ठरला.
शुक्रवारी आलेल्या नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये करोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये लक्षवेधी प्रमाणात कमी झाली आहेत. त्यातच नाताळच्या दिवशी समोर आलेल्या आकडेवारीप्रमाणे मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही करोना रुग्ण आढळला नाही.