मंत्री वळसे पाटील ः भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना सेवा
मंचर (प्रतिनिधी) – मंचर-वडगांव काशिंबेग फाटा येथील भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये करोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे, त्यामुळे पुणे, मुंबई येथे रुग्णांना उपचारासाठी धाव घ्यावी लागणार नाही. त्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे तीन, दोन खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून, तसेच पाच व्हेंटिलेटर भीमाशंकर हॉस्पिटल व्यवस्थापन उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे बाधित गंभीर रुग्णांना येथेच सेवा देणे शक्य होणार आहे, अशी माहिती कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील करोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. 13) बैठक झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, डॉ. हर्षद शेटे, डॉ. विनायक खेडकर, डॉ. सागर गुजराथी, डॉ. सुनील खिंवसरा, डॉ. नरेंद्र लोहकरे, भीमाशंकर हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. श्रीरंग फडतरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. चंदाराणी पाटील उपस्थित होते.
मंत्री वळसे पाटील म्हणाले, सद्यःस्थितीत भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये करोनाची किरकोळ लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळत आहे. बाधित गंभीर रुग्णांना पुणे किंवा पिंपरी-चिंचवड परिसरातील सरकारी दवाखान्यांत पाठवले जाते. त्याऐवजी आता बाधित गंभीर रुग्णांना भीमाशंकर हॉस्पिटलमध्येच सेवा देण्यासाठी कार्यवाही करावी, तसेच अवसरी खुर्द येथील शासकीय महाविद्यालयात कोव्हिड-19 सेंटर सुरू करण्यासंदर्भात आदेत त्यांनी दिले आहेत.
सहा खासगी डॉक्टर देणार सेवा -प्रसाद
जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली तीन रुग्णवाहिका कार्यरत असून, चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यामुळे सात रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. ग्रामपंचायतीने लोकसंख्येप्रमाणे रुग्णवाहिका खरेदी कराव्यात. आदिवासी दुर्गम भागातील ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून सहाय्य केले जाणार आहे. मंचर परिसरातील सहा खासगी डॉक्टर बाधित रुग्णांना भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहेत. शासकीय महाविद्यालय अवसरी खुर्द येथे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.