गरज नैराश्‍य झटकण्याची! (अग्रलेख)

देशातील महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असतानाच कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून होत असलेल्या विधानांवरून या पक्षाची पराभूत मानसिकताच समोर येत आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले सलमान खुर्शीद आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ही विधाने केली आहेत आणि त्यामुळे ऐन निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होण्याचा धोका आहे. सध्या कॉंग्रेस पक्ष एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या विजयाची शक्‍यता कमी आहे. तसंच सध्या पक्ष आपलं भविष्यही ठरवू शकत नाही अशा परिस्थितीत पोहोचला आहे, अशा शब्दांत खुर्शीद यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले आहेत आणि त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे विधान केले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकाच आईची लेकरं आहेत आणि एकाच आईच्या मांडीवर आम्ही दोन्ही पक्ष खेळलो आहोत. त्यामुळे भविष्यात आम्ही एकत्र येऊ, असे त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्याची गरज असताना हे नेते निराशावादी विधाने करीत असतील तर पक्ष लढणार कसा आणि जिंकणार कसा, हाच प्रश्‍न आहे. खुर्शीद यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून अद्याप पक्ष सावरला नाही आणि अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाकडे पाठ फिरवल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे. ऐन निवडणुकीत अशी विधाने करू नयेत हे खरे असले तरी खुर्शीद यांनी एक कटू सत्य मांडले आहे हेही विसरून चालणार नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

सत्ताधारी भाजपचा आकडा 303 वर गेला असताना कॉंग्रेसला मात्र फक्‍त 52 जागा मिळाल्या होत्या. या पराभवानंतर राहुल गांधी यांनी घाईगडबडीत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अन्य कोणताही नेता हे पद स्वीकारण्यास तयार नसल्याने सोनिया गांधी यांच्याकडे कॉंग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षातून जवळजवळ अंग काढून घेतले आहे. दोन राज्यांच्या निवडणूक असतानाही ते परदेश दौऱ्यावर निघून गेले. ते निवडणूक प्रचारात उतरणार की नाहीत याबाबत पक्षाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. खरेतर लोकसभा निवडणुकीचा प्रचार राहुल गांधी यांनी खूप जोरात आणि जोशात केला होता.

मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत अशी शक्‍यता त्यामुळे निर्माण झाली होती. दुर्दैवाने पक्षाला यश मिळाले नाही म्हणून राहुल गांधी यांनी एकदमच संन्यस्थ भूमिका घेतली आणि अक्षरशः पक्षाला वाऱ्यावर सोडून दिले. अध्यक्षपद न सोडण्याची पक्षाची विनंती त्यांनी मान्य केली नाही. गांधी घराण्यातील कोणीही व्यक्‍ती अध्यक्ष असू नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती. गेल्या चार महिन्यांच्या काळात ते पक्षाच्या कोणत्याही व्यासपीठावर दिसले नाहीत आणि इतर सार्वजनिक समारंभातही दिसले नाहीत. कॉंग्रेस पक्षाचा चेहरा म्हणून ज्या नेत्याकडे पाहिले जात होते तो चेहराच असा गायब झाल्याने खुर्शीद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या भावनांना वाट करून देणे योग्यच आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे पक्षाची ही पराभूत आणि नकारात्मक मानसिकता जास्तच समोर आली आहे. केवळ निवडणुकीत यश मिळाले नाही म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आता थकले असल्याचे विधान त्यांनी केले आहे. खरे तर गेल्या पाच वर्षांच्या काळातच पक्षाकडे सत्ता नाही. त्यामुळे या पाच वर्षांत विरोधी बाकांवर बसून पक्ष थकला, असे शिंदे यांना म्हणायचे आहे का, हे पाहावे लागेल. त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विलीनीकरणाचा विषय पुन्हा काढला असला तरी राष्ट्रवादीची ती मानसिकता नाही हे समजून घ्यायला हवे.

मुख्य म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष थकलेला नाही. या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वयाच्या 80व्या वर्षीही राज्यात झंझावात निर्माण केला आहे. महत्त्वाचे नेते पक्ष सोडून गेल्यानंतरही पवार किंवा त्यांचा पक्ष कोठेच नकारात्मक किंवा पराभूत मानसिकतेत गेला नाही. महाराष्ट्राची निवडणूक एकतर्फी होणार नाही इतके आव्हान त्यांनी भाजप आणि शिवसेनेसमोर उभे केले आहे. त्यामुळे हा पक्ष विलीनीकरणाच्या तयारीत किंवा मानसिकतेत असेल अशी अजिबात शक्‍यता नाही. पवार यांच्यासारखे नेतृत्व सध्या कॉंग्रेसकडे नाही हे वास्तव आहे आणि खुर्शीद व शिंदे यांच्या विधानांवरून ते स्पष्ट होत आहे. देशातील सर्वांत जुन्या पक्षाने असे कोशात जाणे देशातील लोकशाहीला आणि कॉंग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे आता तरी पक्षाने मरगळ झटकून कामाला लागायला हवे. उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या प्रियांका गांधी यांनी पराभवानंतरही तेथून पळ काढला नाही.

राज्यात पक्ष संघटना प्रभावी करण्यासाठी त्या राबत आहेत. यापासून इतरांनी बोध घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मी बाजीप्रभूसारखा आहे, पळून जाणार नाही, अशी गर्जना करून पक्षाला चेतना देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसचा विचार मानणाऱ्या प्रत्येक नेत्याने आणि कार्यकर्त्याने अशी सकारात्मक भूमिका घेतली तरच पक्षाला ऊर्जा मिळेल. मुख्य म्हणजे राहुल गांधी यांनी स्वतःला सावरून आता पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरायला हवे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाला मागे टाकून पुढे जायला हवे. राहुल यांना पक्षातील काही गोष्टी पटत नसल्याने ते बाजूला गेले आहेत, असे बोलले जाते त्याची दखलही पक्षाला घ्यावी लागेल.

तरुणांच्या हातात पक्षाचे नेतृत्व देण्याची राहुल यांची भूमिका पक्षाने लक्षात घ्यायला हवी. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नुसती नकारात्मक विधाने करून किंवा घरचा आहेर देऊन काहीच साध्य होणार नाही. पराभूत मानसिकतेतून हा पक्ष वेळीच बाहेर पडला नाही तर देशाला कॉंग्रेसमुक्‍त करण्याची भाजपची दर्पोक्‍ती प्रत्यक्षात आणण्याचे काम कॉंग्रेकडूनच केले जाईल म्हणूनच निवडणुकीतील जय आणि पराजय बाजूला ठेवून नेते आणि कार्यकर्ते यांचे मनोबल वाढवण्याचा एक कलमी कार्यक्रम आगामी काळात पक्षाला राबवावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.