विवरणाबाबत प्राप्तिकर विभागाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली – प्राप्तिकरदात्यांना विवरण सादर करताना अधिक मूल्याच्या खर्चाचा तपशील देण्याची गरज नाही, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
अशा प्रकारचा तपशील सादर करण्यासाठी विवरण फॉर्ममध्ये बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. यासंदर्भात वृत्तमाध्यमात बातम्या आल्यानंतर कर विभागातील अधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण केले. बातम्यांनुसार हॉटेलमधील 20 हजारपेक्षा जास्त बिल, विम्याचा 50 हजार रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम, आरोग्य विम्याचा 20 हजारांपेक्षा जास्त प्रीमियम, शाळा-कॉलेजमध्ये दिलेले एक लाखापेक्षा जास्त डोनेशन इत्यादींचा तपशील कर विभाग विवरणात मागणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.
या खर्चाचा तपशील प्राप्तीकर दात्यांकडून थेट मागण्याऐवजी असा तपशील प्रप्तिकर विभाग वित्तीय संस्थांकडून संकलित करण्याची शक्यता आहे. बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच प्राप्तिकर विभाग कर टाळणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवण्याची शक्यता आहे. अनेक बाबींवर मोठा खर्च करून काही करदाते त्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे भासवितात व कर भरत नाहीत. अशा करदात्यांकडे कर विभाग वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लक्ष देणार असल्याचे दिसून येते. बॅंक खाती, चल-अचल संपत्तीची खरेदी विक्री, शेअर- कर्जरोखे, म्युच्युअल फंडाची माहिती कर विभागाला मिळते.
पॅन आणि आधार क्रमांकामुळे मिळते माहिती
मोठ्या रकमेचे व्यवहार करताना पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक नमूद करणे प्राप्तिकर विभागाने अगोदरच बंधनकारक केले आहे. या आधारावर प्रत्येक विभागाला मोठ्या व्यवहाराची माहिती मिळते. त्या आधारावर कर चुकवेगिरीकडे प्रत्येक विभाग लक्ष ठेवून असतो असे सूचित करण्यात आले. भारताची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय उत्पन्न पाहता भारतातील प्राप्तिकर दात्यांची संख्या फार कमी आहे. ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.