शालेय साहित्य खरेदीची सक्‍ती नको

– दत्तात्रय गायकवाड

प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळेमधून ओळखपत्र, दप्तर, वह्या, व्यवसायमाला, इतर शालेय साहित्य खरेदी करण्याची अनेक वर्षांपासूनची सक्‍ती थांबणार कधी? असा सवाल पालकवर्गातून केला जात आहे.

हवेली तालुक्‍यात अनेक नामांकित व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. देश तसेच राज्य पातळीवर अभ्यासक्रमाचे शिक्षण या शाळांमधून देण्यात येत आहे. राज्य शासनाकडून खासगी अनुदानित तत्त्वावर असणाऱ्या शाळांत देखील शालेय साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत असून या कामी पालक वर्गाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मुलांना मोफत पाठ्यपुस्तके शासनाने दिलेली आहेत. त्यामुळे पुस्तकांच्या खरेदी करण्याचे तेवढे वाचले आहे. शालेय साहित्याची खरेदी करून त्याची शाळेतील विद्यार्थी व पालकांना विक्री करताना संबंधित संस्था व शाळेला मोठ्या प्रमाणात कमीशन मिळत आहे. याच पद्धतीने अमुक दुकानातून गणवेश खरेदी करण्याची पत्रके देखील शाळा व्यवस्थापन वाटत असल्याने यातून देखील शाळांना मोठ्या प्रमाणात कमीशन मिळत आहे. शाळा सुरू झाल्यावर पालकांकडून शालेय साहित्य खरेदीच्या रकमा गोळा करण्यासाठी शाळेतील शिक्षक, लेखनिक यांची नेमणूक करण्यात येत आहे. उधारीवर साहित्य देऊन शिक्षक, लेखनिक यांच्याकडून विद्यार्थ्यांना वारंवार वर्गात उभे करून अपमानास्पद वागणूक देऊन शालेय साहित्याच्या रकमेची वसुली करण्यात येत आहे. मान्यता प्राप्त शाळांमध्ये शालेय साहित्याची खरेदी करू अथवा नये याबाबत पालकसभा मधून चर्चा होणे गरजेचे आहे; मात्र शाळा व्यवस्थापन अनेक खासगी संस्थांच्या शाळांत होणाऱ्या पालकसभा त्याच शाळेतील शिक्षकाकडून कागदोपत्री रंगवण्यात येत आहेत. त्यामुळे पालकांनी याबाबत जागृत राहणे काळाची गरज बनली आहे. वार्षिक फी च्या नावाखाली, इमारत निधी आणि शालेय फी च्या नावाखाली चालणारी बेकायदा लूट केवळ पालकांच्या जागृतीने आणि अधिकारी वर्गाच्या कडक कारवाईने थांबू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.