केंद्र सरकारच्या निर्णयावर मजदूर संघाची नाराजी : देशव्यापी लढ्याचा इशारा
पुणे – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार संरक्षण उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढवून, दारूगोळा निर्माणी कारखान्यांचे (ओएफबी) कॉर्पोरेटायझेशन करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले; परंतु सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मजदूर संघातर्फे कारखान्याच्या कॉर्पोरेटायझेशनला विरोध करण्यात आला आहे.
संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे निर्माणी कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन महत्त्वाचे असल्याने आगामी काळात हा बदल करणे अनिवार्य आहे. त्यादिशेने लवकरच सरकार पावले उचलणार असल्याचे वित्तमंत्रांनी सांगितले. मात्र, ओएफबी कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांची संघटना असलेल्या भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघटना (बीपीएमएस)तर्फे या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात आला आहे. हा निर्णय कामगार आणि संस्था या दोन्हींच्या दृष्टीने अन्यायकारक असून, यामुळे संस्थेच्या कामावर मोठा प्रभाव पडणार आहे.
तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही हा निर्णय धोकादायक असून, मजदूर संघटनेतर्फे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशव्यापी लढा उभारणार असल्याचे संघटनेचे सचिव मुकेश सिंग यांनी सांगितले.