एलओसीवर आता गोळीबार नाही; चीन नरमल्यावर पाकनेही घेतले नमते

नवी दिल्ली – लडाख आणि गलवान भागात भारताविरूध्द आगळीक करणाऱ्या चीनने आता नरमाईची भूमिका स्किारल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. मात्र चीनने जेव्हा भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा पाकिस्तानचे बाहुही भारताविरूध्द फुरफुरायला लागले होते. मात्र चीनच्या नरमाईच्या भूमिकेनंतर आता पाकिस्तानही काहीसा नरमला असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत डिजीएमओ स्तरावर हॉटलाइनवरून चर्चा झाली असून त्यातून तसे संकेत मिळत आहेत.

भारताकडून डिजीएमओ जनरल परमजीत सांघा आणि पाकिस्तानकडून नुमान जकारीया यांनी हॉट लाइनवर चर्चा केली. तेव्हा 24 आणि 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून दोन्ही देशांत अगोदर जे करार झाले आहेत त्यांची अंमलबजावणी सुरू केली जावी याबाबत सहमती झाल्याचे सांगण्यात आले.
चर्चेनंतर दोन्ही बाजूंचे एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे.

ते प्रसिध्द करत जारी केलेल्या निवेदनात संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सीमेवरील स्थितीसोबतच परस्परांना लाभप्रद ठरेल अशा बाबी आणि स्थायी स्वरूपात शांतता राखण्यासंदर्भातही सहमती झाली आहे.

हिंसाचार रोखणे आणि शांतता प्रस्थापित करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही देशांत झालेले सगळे करार, सीमेवरील अर्थात नियंत्रण रेषेवरील युध्दबंदीचे कठोरपणे पालन करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

पाकिस्तानकडून एलओसीवर युध्दबंदीच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये 44 टक्के वाढ झाली असल्याचे अलिकडेच भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले होते. एलओसीवर गेल्या 28 सप्टेंपर्यंत पाकिस्तानच्या बाजूने गोळीबाराच्या 4700 घटना घडल्या होत्या. आता युध्दबंदीचे पालन करण्याची सहमती झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.