व्यायाम करणे ही गोष्ट अनेकांच्या बाबतीत दुय्यम स्थानावर असते, पण आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर असे करून चालत नाही. आता जरी तुम्ही व्यायाम करणे टाळत असाल तर भविष्यात तुम्हाला त्याचा निश्चितच त्रास होऊ शकतो. उत्तम आरोग्यासाठी झोप, आहार जितका महत्त्वाचा असतो तितकेच व्यायामाचेही महत्त्व आहे.
त्यामुळे व्यायामाला कोणताही पर्याय नाही हे लक्षात घ्या. सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच स्वत:ला सिद्ध करावे लागते. अशावेळी ऑफिसच्या वेळा आणि ऑफिससाठी होणारा प्रवास यालाही पर्याय नाही, पण अशावेळीही काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही स्वत:ला निश्चितच फीट ठेऊ शकता, पण त्यासाठी ठरवलेल्या गोष्टी आवर्जून केल्या जातील इतकी काळजा मात्र घ्यायला हवी. पाहूयात व्यायामाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी नियमित केल्यास फायदेशीर ठरतील…
- श्ज्याठिकाणी पायऱ्यांचा वापर करणे शक्य आहे अशा ठिकाणी लिफ्टने जाणे टाळा.
- दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये आणि रात्रीच्या जेवणानंतरही न विसरता आणि न कंटाळता किमान 15 ते 20 मिनिटे चाला.
- सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम आहे. 12 सूर्यनमस्कार घालण्यासाठी केवळ 15 मिनिटे लागतात. त्यामुळे दररोज न विसरता सूर्यनमस्कार घाला.
- दिवसभर कॉम्प्युटरवर काम असल्याने अनेकदा स्नायूंची हालचाल होत नाही. स्नायू आखडल्यासारखे होतात. असे होऊ नये म्हणून ऑफिसमध्ये, प्रवासादरम्यान किंवा मधे थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर हातापायाचे स्ट्रेचिंग न विसरता करा. यामध्ये मान, कंबर, पाठ यांचेही स्ट्रेचिंग केल्यास स्नायू मोकळे होण्यास मदत होते.
- ऑफिसमध्ये सलग एका जागेवर न बसता दर एक ते दीड तासाने मोकळ्या हवेत एखादी चक्कर मारून या. यामुळे पाय मोकळे होण्यास मदत होते. प्रिंट आऊट आणणे, दुसरा मजला किंवा थोडे लांब बसणाऱ्या व्यक्तीशी कामाविषयी बोलणे, पाणी पिणे यांसारखी कामे मुद्दाम केल्यास नकळत चालणे होते.
- प्राणायाम आणि ध्यान या धावपळीच्या जीवनशैलीत अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास निश्चितच मदत होते. तेव्हा दिवसातील 10 मिनिटे यासाठी आवर्जून काढा.