पाटणा – बिहारमधील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू यांच्यात युती झाली असून या युतीत कोणत्याही पक्षाच्या कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार हेच राहतील, असे भारतीय जनता पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जेडीयूच्या जागा कमी करण्यासाठीच लढत आहोत, असे निवेदन लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी हे प्रतिपादन केले.
त्यांनी लोकजनशक्ती पक्षाच्या निर्णयाचाही निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चिराग पासवान यांचे वडील जर आज सक्रिय असते तर त्यांनी अशी भूमिका घेतली नसती. लोकजनशक्ती पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवण्यास आमचा विरोधच आहे, असेही सुशीलकुमार मोदींनी स्पष्ट केले.
लोकजनशक्ती पक्षाने, आमचे भाजपशी वैर नाही आमची व भाजपची युती सत्तेवर यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. लोकजनशक्ती पक्षाने आपल्या प्रचारपत्रकांवर मोदींचे फोटो छापले आहेत. त्यावरून आज पत्रकारांनी सुशीलकुमार मोदी यांना विचारले असता जरूर पडली तर आम्ही त्या विषयी निवडणूक आयोगाकडेही तक्रार करू, असे म्हटले आहे.
एनडीएतील घटक पक्षांनाच पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्याचा अधिकार आहे. या निवडणुकीत लोकजनशक्ती पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी मोदींचा फोटो छापण्यास आमचा आक्षेपच आहे, असेही सुशीलकुमार मोदी यांनी स्पष्ट केले.