न्हावरे (वार्ताहर) – मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, देशाचे नेते शरद पवार यांच्यासोबत आहे, असे शिरूर-हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी ‘दैनिक प्रभात’शी बोलताना सांगितले. त्यामुळे राज्यात कितीही मोठे राजकीय भूकंप झाले तरी मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे अशोक पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंड पुकारून आज (दि.२३) सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. तसेच अजित पवार यांच्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संबंध नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान अशोक पवार हे काही दिवसांपूर्वीच धार्मिक कार्यासाठी राजस्थान मधील जयपूर येथे गेले होते. ते काल (दि.२२) रात्री उशिरा पुण्यात परतल्यामुळे आज (दि.२३) दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले. अशोक पवार मुंबईला पोहोचले असून पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.