मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. या नेत्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप नेते एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एका वृत्तवहिनीला बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. हा बडा नेता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेच असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरु आहेत.
कधी कधी क्रोध आणि रागाच्या मनात ते असं म्हणतात की मला विचार करावा लागेल. पण मी तुम्हाला १०० टक्के सांगतो की ते जेव्हा शांतपणे बसतात तेव्हा त्यांच्या मनात पुन्हा तोच विचार येतो, तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें ना रहें… जो काही त्यांच्यावर झालेल्या अन्यायबाबतची त्यांच्या वेदनेचा स्वतंत्र विचार होईल.” “माझ्या आयुष्यात राजकारणाची थोडी किंवा व्यक्ती समजण्याची थोडी तरी समज असेल, तर खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खडसेंचा विषय त्यांच्याच पक्षाने हाताळावा असे म्हटले आहे.