करोनाचा धोका वाढण्याची शक्यता
लंडन – बकरी ईद साजरी करताना पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी करोनाबाबतच्या नियमांना धाब्यावर बसविल्याचे समोर आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा या खेळाडूंनी उडविल्याचे त्यांच्या फोटोवरून स्पष्ट झाल्यावर त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. या दोन संघात लवकरच क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागत आहे. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असतानाही त्यांच्या खेळाडूंना याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचेच सिद्ध झाले आहे.
या क्रिकेटपटूंनी ईदच्या शुभेच्छा देतानाचे फोटो पोस्ट केले असून त्यात मास्कचा वापर केला नसल्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर अनेकांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. आता याबाबत पाकिस्तान सरकार, क्रिकेट मंडळ तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ आणि आयसीसी काय भूमिका घेते हे आगामी मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
या दौऱ्यावर येण्यापूर्वी पाक संघातील 10 खेळाडू करोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता या नव्या प्रकरणामुळे या मालिकेवरही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.