भूसंपादनात शेतकऱ्यांचे नुकसान नको -हर्षवर्धन पाटील

रेडा -मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन (हायस्पीड रेल्वे) पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यातून जाणार आहे. या बुलेट ट्रेनसाठी जमिन संपादित करताना शेतकऱ्यांना विश्‍वासात घ्यावे, तसेच बागायती शेतीचे नुकसान होऊ नये, असा रेल्वे मार्ग निवडावा, 

संपादित जमिनीला चांगला मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे निवेदनाद्वारे केली तसेच यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चाह करण्यात आली.

यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, राज्य साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपस्थित होते. दरम्यान, बागायती शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.

असा बुलेट ट्रेनचा मार्ग असेल, संपादित जमिनीस समाधानकारक मोबदला दिला जाईल तसेच रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बैठक घेऊ, अशी ग्वाही यावेळी दानवे यांनी शिष्टमंडळास दिली.

केंद्र सरकारचा मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग जाणाऱ्या इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा आदी तालुक्‍यांमध्ये सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. इंदापूर तालुक्‍यातूनही हा रेल्वे मार्ग जाणार आहे.

इंदापूर तालुक्‍यात एकूण 4 प्रस्तावित मार्गाचे रेल्वेने सर्वेक्षण केले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपण एकमेकांशी संपर्कात राहू, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात ग्वाही दिल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.