इस्लामाबाद – जगातील सर्वात एकाकी प्राणी अशी संभावना होत असलेल्या कवण या हत्तीची अखेर या एकाकीपणातून सुटका झाली असून कंबोडियातील अभयारण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला आहे. हा हत्ती गेली 35 वर्षे पाकिस्तानातील प्राणी संग्रहालयात एकटाच राहत होता.
त्याला इतर हत्तींचा सहवास मिळावा म्हणून रविवारी त्याची सुटका करण्यात आली. त्याची रवानगी कंबोडियात करण्यात आली. अर्थात या हत्तीला एका खुल्या आणि मोठ्या कंटेनरमध्ये बसवताना अधिकाऱ्यांची चंगळीच तारांबळ उडाली. त्यासाठी अनेक तास खर्च झाले. जर या हत्तीने कंटेनरमध्ये प्रवेश करण्यास सहकार्य केले नसते तर त्याची ही सुटका आणखी काही महिने लांबली असती.
प्राण्यांच्या कल्याणासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या फोर पॉज इंटरनॅशनल या संस्थेच्या मदतीने या हत्तीची सुटका करण्यात आली. 2016 पासून आम्ही या हत्तीला इतरत्र पाठवण्याचे प्रयत्न करीत होतो. अखेर त्या प्रयत्नांना यश आले अशी माहिती या संस्थेचे प्रवक्ते मार्टिन बॉयर यांनी दिली.
हा हत्ती पाकिस्तानातील ज्या प्राणी संग्रहालयात होता, तेथील स्थिती इतकी वाईट होती कि या हत्तीला अनेक जखमा झाल्या होत्या. त्याला खायला आणि प्यायला व्यवस्थित मिळत नव्हते. म्हणून न्यायालयाने हे प्राणी संग्रहालय ऑगस्ट महिन्यात बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या हत्तीच्या सुटकेसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. अखेर रविवारी एका रशियन कार्गो विमानातून त्याला कंबोडियातील 25 हजार एकर क्षेत्रातील अभयारण्यात पाठवण्यात आले.