पिंपरी – गेल्याच आठवड्यात लिफ्ट दिलेल्या एका वाटसरूने दुचाकीस्वारास मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज आणि दुचाकी चोरून नेली. तसेच अनोळखी व्यक्तीमुळे करोना होण्याची भीतीही अनेकांच्या मनात आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला तासन्तास थांबूनही पूर्वीप्रमाणे आता वाहनचालक लिफ्ट देण्यास तयार नसल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून येत आहे. जणू काही नो लिफ्ट प्लीज अशीच भावना पाहण्यास मिळत आहे.
अनेकदा लिफ्ट प्लीज म्हणून रस्त्याच्या कडेला कुणी ना कोणी वाहनचालकाला हात दाखवतोच. सध्या सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. तसेच रिक्षाचालकांनीही मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून वाहनचालकांकडे लिफ्ट मागण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु वाटसरूंच्या या मागणीला वाहनचालक टाळत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यालगत उभे राहून काही अंतरावर जाण्यासाठी एखाद्या वाहनाची वाट पाहायची आणि लिफ्ट घेण्याची अनेकांना सवय असते.
स्पीडबेकर असेल अशा स्पॉटला थांबून वाहनाला हात देत अपेक्षित ठिकाणी जायचे आहे, असे म्हटले जाते. वाहन थांबले तर ठीक नाहीतर अजून दुसऱ्या वाहनाची वाट पाहिली जाते, असा वाटसरूंचा प्रवास नेहमीचा ठरलेला अन् त्यात जर वाहनधारक गप्पिष्ट असेल तर वाटसरूचा प्रवास साफल्याचा होतो. परंतु सध्या करोनाच्या काळात वाटसरूंनी हात दाखवून गाडी थांबत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे.
विशेषतः ग्रामीण भागात रस्त्याच्या दुर्तफा वाटसरू पायी चालताना नित्याचेच दिसून येतात. त्यांच्याकडे पैशाचा अभाव असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून ते लिफ्ट मिळविण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशाने मनात इच्छा असतानाही एकही वाहनचालक वाटसरूंना लिफ्ट देण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.
…तर पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे होईल
रस्त्याने पायी जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांना हात दाखविल्यास कुणीही वाहन थांबवून लिफ्ट देत असे. मात्र करोनाचा संसर्ग वाढल्यापासून प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. माझ्यामुळे त्याला किंवा त्याच्यामुळे मला संसर्ग झाल्यास पायावर दगड पाडून घेण्यासारखे ठरेल. त्यामुळे अनेक महिन्यांपासून लिफ्ट देणे बंद केल्याचे एका दुचाकीस्वाराने सांगितले.