गळा चिरल्यावर जीव गेला नाही…मग मारली दुसऱ्या मजल्यावरुन उडी

पुणे – विश्रांतवाडी परिसरातील एका तरुणाने स्वतःचा गळा धारधार शस्त्राने चिरून, अंगावर जखमा करून घेतल्या. त्यानंतर देखील जीव जात नसल्यामुळे इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. राहुल रामा सूर्यवंशी (32, मूळ रा. दगडवाडी, ता. निलंगा, जि. लातूर, सध्या रा. कस्तुरभा सोसायटी, विश्रांतवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी सांगितले की, राहुल हा पत्नी सोबत रहात होता, मात्र लॉकडाऊन मुळे कामधंदा नसल्याने तो पत्नीसह गावाला गेला होता. राहुल हा नो पार्किंग मधील वाहतुकीच्या गाड्या लोड, अनलोड करण्याचे काम करत होता. काही दिवसांपुर्वीच तो काम सुरु झाल्याने एकटाच पुण्यात आला होता. रविवारी त्याने राहत्या घरात स्वतःचा गळा चिरून घेत शरीरावर सर्वत्र जखमा करून घेतल्या. तरी देखील जीव जात नसल्याने त्याने इमारतीवरून खाली उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रचंड झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुल ने आत्महत्या का केली याचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांना सुरवातीला हा प्रकार खुनाचा वाटत होता, मात्र त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना विचारपूस केल्यावर त्याने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्याच्या मित्राने त्याचा पत्नीला फोन लावून दिल्यावर राहुलने मला किरकोळ जखम झाली आहे, काळजी करु नकोस तु पुण्याला ये असे सांगितले. मात्र कॉल कट होताच काही मिनीटांतच त्याने प्राण सोडले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यावर त्याने आत्महत्या करत असल्याचे रेकॉडिंगही आढळले.

Leave A Reply

Your email address will not be published.