वॉशिंग्टन- दक्षिण अफ्रिकेत सापडलेला नवीन विषाणु ही आमच्यासाठी चिंतेची बाब असली तरी त्यातून आमच्याकडे गोंधळाची स्थिती नाही. या संबंधात व्यापक लॉकडाऊन लागू करण्याचा प्रस्ताव आमच्या विचाराधिन नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकन नागरीकांनी बुस्टर डोस सह आता पुर्ण लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. मास्क वापरण्याचे निर्बंधही नागरीकांना प्रामाणिकपणे पाळावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. व्हाईट हाऊस येथे बोलताना ते म्हणाले की नवीन विषाणु अमेरिकेत पोहोचेल हे अगदीच अटळ आहे. पण त्यापासून अमेरिकन नागरीकांचे संरक्षण करण्याची यंत्रणा आमच्याकडे तयार आहे.
जेव्हा हा नवीन विषाणु आमच्या देशात पोहचेल त्यावेळी त्याचे आव्हान आम्ही पेलू. या आधीचीही करोनाची आव्हाने आम्ही पेलली आहेत असेही त्यांनी नमूद केले. अनेक देशांनी विदेशी प्रवाशांवर बंदी घालायला सुरूवात केली असली तरी अमेरिकेचा तसा कोणताही प्रस्ताव नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.