नवी दिल्ली –टोकियो ऑलिम्पिकच नव्हे तर आणखी दोन ऑलिम्पिक खेळण्यासाठी सज्ज आहे, असे मत भारताची ऑलिम्पिकपटू जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने व्यक्त केले आहे. दीपाची तयारी कसून सूरू असल्याचे विश्वेश्वर नंदी या तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या जवळ गेलेल्या दीपाला त्यावेळी जरी यश आले नव्हते तरी आता पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्यासाठी सज्ज असल्याचेही दीपाने सांगितले आहे. सध्या दीपा वैयक्तिक सराव करत असून नवोदित खेळाडूंना ऑनलाइन प्रशिक्षणही देत आहे. मार्चपासून देशात करोनाचा धोका निर्माण झाल्याने स्पर्धा तसेच सरावावर बंदी आली. तेव्हापासूनच दीपाने आपल्या अकादमीतील नवोदितांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.
टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू असतानाच ही स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलली गेल्याचे समजले. खरेतर त्यावेळी खूप निराशा आली होती. मात्र, हा जबरदस्तीचा मिळालेला वेळच त्या स्पर्धेच्या तयारीसाठी निर्णायक ठरेल, असा विचार केल्यावर निराशाजनक मानसिकतेतून बाहेर आले. आता पूर्ण लक्ष्य सरावावरच असून सातत्याने प्रशिक्षकांच्या संपर्कात आहे, त्यामुळे काही चूक घडली तर लगेचच त्यावर मार्ग शोधला जातो, असेही दीपा म्हणाली. केंद्र सरकारच्या
टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेत दीपाचा समावेश असून टोकियोनंतरही पुढील दोन ऑलिम्पिक स्पर्धांसाठीही तिचे या योजनेतील स्थान कायम राहील. आता तिच्यासमोर 2022 साली होत असलेल्या आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धांवरही तिचे लक्ष असून त्यासाठीच सध्या रोज दोन सत्रांमध्ये तिचा सराव सुरू आहे.
पूर्ण तंदुरुस्त
दीपाला या वर्षाच्या प्रारंभी दुखापत झाली होती. त्यावेळी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातून आता दीपा पूर्ण तंदुरुस्त ठरली असून येत्या काळात करोनाचा धोका कमी झाल्यावर सुरू होत असलेल्या स्पर्धांसाठी सज्ज होत आहे.