निळवंडे कालव्यांसाठी 5 वर्षांत निधी मिळाला नाही : आ. थोरात  

संगमनेर –1999 मध्ये राज्यमंत्री झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. अनेक अडचणीवर मात करून 2012 पर्यंत धरणाची भिंत पूर्ण केली. कालव्यासाठी निधी मिळवला. मात्र 2014 नंतर ते एप्रिल 2019 पर्यंत पुर्णत: काम बंद होते.

निवडणूक आल्याने निधी देण्याच्या घोषणा झाल्या, मात्र 5 वर्षात या सरकारने निळवंडे कालव्यासाठी कोणताही निधी दिला नाही आता काहीजण न दिलेल्या निधीचे श्रेय घेण्यासाठी धडपड करतात अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

तळेगाव, चिंचोली गुरव, कासारे , कौठे कमळेश्वर, नान्नज दुमाला या गावांमध्ये प्रचारार्थ आयोजित बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, अजय फटांगरे, महेंद्र गोडगे, रमेश दिघे, प्रभाकर कांदळकर, अनिल कांदळकर, तात्यासाहेब दिघे, नामदेव दिघे, भाऊसाहेब कुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. यात कधीही राजकारण केले नाही. निळवंडे धरण व कालवे पूर्ण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र मागील 5 वर्षात भाजप-सेना सरकारने कालव्याच्या कामासाठी एक रुपयाही निधी दिला नाही.संस्थानने 500 कोटी दिल्याची अफवा झाली तो निधी मिळाला नाही. सरकार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 1100 कोटी निधी दिल्याची घोषणा केली. फक्त निवडणुका आल्या की निधी दिला अशा घोषणा यांनी केल्यात. जनतेची दिशाभूल होत असून निधीवर श्रेय घेण्यासाठी अनेक जण टपले आहेत.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व आणि संगमनेरकरांच्या विश्वासामुळे अगदी कमी कालावधीमध्ये मिळालेल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपण सक्षमपणे सांभाळत असून संगमनेर तालुक्‍याची जबाबदारी तालुक्‍यातील सर्व कार्यकर्ते सांभाळत आहेत. अनेकजण सत्तेसाठी पक्ष बदल करून दुसरीकडे आपण मात्र राजकारण सत्तेसाठी न करता तालुक्‍याच्या विकासासाठी करत आहोत. असे आ. थोरात म्हणाले. यावेळी मोठ्या संख्ये ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.