कोणतेही आर्थिक संकट आलेले नाही

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे स्पष्टीकरण

मुंबई -चीनच्या व्हिवो कंपनीने आयपीएलचे प्रायोजकत्व सोडले असले तरीही बीसीसीआयवर कोणतेही आर्थिक संकट आलेले नाही, अशा शब्दात बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी याबाबतचे वृत्त फेटाळले आहे.

मार्चमध्ये होणारी आयपीएल स्पर्धा करोनाच्या धोक्‍यामुळे स्थगित करण्यात आली होती. ही स्पर्धा आता येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अमिरातीत होत आहे. स्पर्धा आयोजित करणे ते दखील परदेशात जरा कठीणच असते. त्यासाठी अफाट खर्चही होणार आहे. मात्र, बीसीसीआयला आर्थिक तोटा झाल्याचे माध्यमांमध्ये पसरलेले वृत्त निखालस खोटे आहे. बीसीसीआयवर कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट आलेले नाही, असे गांगुली यांनी सांगितले आहे.

चीनबरोबर सध्या भारताच्या संबंधात तणाव निर्माण झालेला असताना चीनच्या कोणत्याही कंपनीचे प्रायोजकत्व नको, असा दबाव बीसीसीआयवर वाढला होता. त्यामुळे यांच्याशी असलेला करार दोन्ही बाजूने मोडला गेला. या कंपनीकडून बीसीसीआयला करारानुसार 2 हजार 199 कोटी रुपये मिळतात. तसेच प्रत्येक वर्षाचे 440 कोटी रुपये बीसीसीआयला देण्यात येतात. हा करार मोडल्याने प्रायोजकतेसाठी पुढे आलेल्या नव्या कंपन्यांकडून इतकी रक्कम मिळणार नसल्याने बीसीसीआयला तोटा होणार अशा स्वरूपाचे वृत्त माध्यमांनी दिले होते. मात्र, याचे खंडन करताना गांगुली यांनी आपली बाजू मांडली. व्हिवोशी झालेला करार मोडल्याने आता बीसीसीआय नव्या प्रायोजकांच्या शोधात असून याबात ज्या कंपन्यांनी रस दाखवला आहे त्यांचे प्रस्ताव पाहिल्यावरच याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही गांगुली म्हणाले.

…तर बॉक्‍सिंग डे कसोटी मेलबर्नमध्ये

भारतीय संघाविरुद्धची बॉक्‍सिंग डे कसोटी येथेच होऊ शकते, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचे हंगामी प्रमुख निक होकले यांनी सांगितले आहे. मात्र, त्यापूर्वी व्हिक्‍टोरिया व मेलबर्नमधील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला गेला पाहिजे. तसेच या सामन्यासाठी जर प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यासारखी स्थिती असेल तर मग सामना ऍडलेडला हलविण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात मालिका खेळण्यासाठी येत आहे व त्यासाठी अद्याप बराच कालावधी आहे. त्यामुळे इतक्‍या घाईने सामन्याचे केंद्र बदलण्याबाबत विधान करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.