वीजप्रवाह नको, शेताला पाणीही नको पण बिबट्यास आवरा

Madhuvan

आढळा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला बिबट्याचा धसका
मोटारसायकल स्वारावर बिबट्याने केला हल्ला
अकोले (प्रतिनिधी) -प्रसंगी वीजप्रवाह नको अन्‌ शेतीला पाणीही नको. पण बिबट्या तेव्हढा आवरा, असा आढळा खोऱ्यात सूर उमटत आहे. या खोऱ्यात विशेषतः आढळा धरण परिसरात किमान डझनभर बिबटे असल्याने त्यांची दहशत पसरली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याचा धसका घेतला आहे.

नुकतेच या परिसरात मोटरसायकलवर झेप घेऊन बिबट्याने चालकाला जखमी केले. या व अन्य घटनांमुळे बिबट्याच्या भीतीने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाण्याचे टाळत आहेत, यामुळे शेतातील उभी पिके जळून गेली आहेत. अकोले तालुक्‍याच्या वीरगाव, देवठाण परिसरातील गावांमध्ये सध्या शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

वीरगाव वीज उपकेंद्रातून वीरगाव, हिवरगाव आंबरे, तांभोळ, पिंपळगाव निपाणी, गणोरे, डोंगरगाव, देवठाण या गावांना वीजपुरवठा होतो. कृषीपंपांना होणारा वीजपुरवठा सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अशा तीन टप्प्यात होतो. यापैकी पहिल्या दोन टप्प्यात वीजपुरवठा पूर्ण दाबाने मिळत नाही. शिवाय वारंवार खंडित होतो. तिसरा रात्री 11 ते सकाळी 7 हा कृषीपंपांचा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.

तो तात्काळ बंद करुन दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. या रात्रीच्या वीजपुरवठा काळात एकही शेतकरी घराबाहेर पडण्यास धजावत नाही. त्यामुळे पाणी आणि वीज असूनही शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा, ऊस, गहू, हरबरा, भाजीपाला, चाऱ्याची पिके सुकू लागली आहेत. वीरगाव वीज उपकेंद्र वगळता संपुर्ण तालुक्‍यात दोन टप्प्यात वीजपुरवठा होतो.

केवळ वीरगाव परिसरातील शेतकऱ्यांवरच हा रात्रीच्या वीजपुरवठ्याचा अन्याय आहे, असा शेतकरी वर्गातून सुर आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायचे तर संपुर्ण कुटुंबच एकमेकांच्या साथीला घ्यावे लागते. शिवाय रात्रीच्या वीजपुरवठ्यात खंड पडला तर वीजवितरण कंपनीचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी फोन घेत नाही.

पर्यायी बिबट्याचे भय असले तरी अंधाऱ्या रात्री जीव मुठीत धरुन शेतकऱ्यांना शेतातच थांबावे लागते. या गावांमध्ये अनेकांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन घडले. शेतकऱ्यांची पाळीव जनावरे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडण्याचे तर पाचवीलाच पुजल्यागत आहे. या गावांमध्ये मिळून 10 पेक्षा अधिक बिबट्यांचे वास्तव्य असावे. परंतु वनखात्याचे याकडे पूर्ण दुर्लक्षच आहे. शंका निवारणासाठी वनखात्याचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता शून्य प्रतिसाद मिळतो. प्रचंड मोठ्या जंगलतोडीमुळे डोंगरांच्या सानिध्यातील बिबट्यांचा अधिवास (मुक्काम) सध्या शेतातच आहे.

वीज वितरण कंपनी आणि वनखाते सध्या वीरगाव परिसरात शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत असल्याने मोठा असंतोष या परिसरात पसरला आहे. त्यामुळे तहसीलदार व वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलनाची पूर्वतयारी सुरू आहे.

रात्री कृषीपंपांना मिळणारा वीजपुरवठा बंद करुन तो दिवसा करण्यात यावा. वनखात्याने आवश्‍यक त्या सर्व ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव, तांभोळ आणि देवठाणच्या नागरिकांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.