ना. विखेंमुळे आ. कोल्हेंचे मताधिक्‍य घटणार 

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे आ. स्नेहलता कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे, अपक्ष म्हणून नगराध्यक्ष विजय वहाडणे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. खरी निवडणूक युती व आघाडी होती. मात्र ना. विखे यांनी युती धर्म न पाळल्याची शंका उपस्थित करून आ. कोल्हे यांचे मताधिक्‍य घटण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती पुणतांबा परिसरातील धनंजय जाधव, भाऊसाहेब चौधरी, गंगा चौधरी, बाळासाहेब वाघ, शिवाजीराव लहारे, भाजपचे प्रांतिक सदस्य ऍड. रवींद्र बोरावके व भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विखे यांच्या कार्यकर्त्यांना कोल्हे यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या एक दिवस अगोदर काम करण्याचे आदेश मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. विशेषतः पुणतांबा परिसरातील दहा गावांत विखे यांचे प्राबल्य आहे. तेथे मोठ्या प्रमाणात विखे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार कोल्हे यांच्या विरुद्ध मतदान मोहीम राबविली. या परिसरातील वाकडी, जळगाव येथील विखे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला तसा आदेश आले आहेत. त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत, असे सांगितले. 11 ऑक्‍टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोपरगाव येथे आमदार कोल्हे यांचे प्रचारार्थ आले असता, विखे यांनी आ. कोल्हे या आपल्या भाची असून, मामा म्हणून त्यांना निवडून आणने ही आपली जबाबदारी आहे, अशी जाहीर वाच्यता केली होती.

मात्र ऐन मतदानाच्या दिवशी जि. प.च्या अध्यक्षा राजेश परजणे यांच्या भगिनी शालिनी विखे यांनी गणेश साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्व पाठबळ भावाच्या मागे उभे केले. एकीकडे आ. कोल्हे यांना निवडून आणू असे सांगायचे व दुसरीकडे पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवाच्या, असा प्रकार त्यांनी केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीनंतर खा. सुजय विखे यांनीही जिल्ह्यात भाजप-सेना युतीचे 12 आमदार निवडून आणणार, असा आवाज दिला होता.

मात्र त्यांनीही भाजपा पक्षाच्या अधिकृत उमेदवार कोल्हे यांच्या प्रचारार्थ एकदाही फिरकले नाही. कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात मेरीटेचे काम करून दाखविले आहे. भविष्यात आमदार कोल्हे यांची त्यांना अडचण वाटू लागली आहे, असेच जाणवत आहे. तरी विकासाभिमुख कोपरगावासाठी असलेला मतदार कोल्हे यांच्याच पाठीशी आहे, त्यांचा विजय हा निश्‍चित आहे, असे पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.