पृथ्वीराज, अशोक चव्हाणांच्या मंत्रिपदाबाबत निर्णय नाही – थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) –माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश हा विषय वरिष्ठ पातळीवर होईल. पण या व्यक्तींचा राज्यासाठी उपयोग व्हायला हवा. या दोन्ही नेत्यांना मंत्रिपद न देण्याबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी काहीही सांगितलं नाही, असे वक्तव्य मंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये केले.

खातेवाटपाबाबत बोलताना ना. थोरात म्हणाले, आज किंवा उद्या खातेवाटपाचा विषय पूर्ण होईल. पुढील पाच वर्षे सरकार चालवायचं आहे. त्यामुळे थोडा वेळ जरी लागत असला, तरी लवकरच खातेवाटप होऊन मंत्रिमंडळ विस्तार होईल. याच पार्श्‍वभूमीवर उद्या (दि.9) बैठक होईल, असेही थोरात यांनी सांगितले.

कॉंग्रेसची आज होणारी बैठक रद्द झाल्याचे कारणही थोरात यांनी स्पष्ट केलं. सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदा सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात गेले आहेत. त्यामुळे आजची बैठक रद्द झाली आहे. उद्या ही बैठक पार पडणार आहे. तसेच शिवसेना खासदारांची बैठक रद्द होण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. सध्या लोकसभा अधिवेशन सुरू आहे. त्यात आज रविवार असल्याने शिवसेना खासदारांना येणे शक्‍य नाही. त्यामुळे कदाचित मातोश्रीवरील बैठक रद्द झाली असावी, असे थोरात म्हणाले.

खडसे यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत करू
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क अद्याप झालेला नाही. मात्र खडसे यांनी संपर्क केल्यास त्यांचे कॉंग्रेस पक्षात स्वागतच करू, असे वक्तव्य मंत्री तथा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.