151 पैकी केवळ 14 खड्ड्यांची दुरुस्ती
मोठा गाजावाजा करीत 20 जुलैपासून नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देत व्हॉटस्ऍपच्या 9922501450 या क्रमांकावर आणि सारथी हेल्पलाइनच्या 8888006666 या क्रमांकावर खड्ड्यांची छायाचित्रे पाठविली. त्यानुसार खड्ड्यांची 151 छायाचित्रे पिंपरी-चिंचवड महापालिकेस प्राप्त झाली. मात्र, त्यापैकी केवळ 14 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या अभियानाचा बोऱ्या वाजला आहे.
पिंपरी – मागील सलग पाच दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसाने पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांचे पितळ उघडे केले आहे. अंतर्गत भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. चिंचवड, आकुर्डी, निगडी, रावेत, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली तसेच खडकी, बोपोडी, दापोडी आणि पिंपळे गुरव भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे.
पावसाच्या पाण्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यास पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील ग्रेडसेपरेटरवरील रस्ते ही उखडले आहेत. पाणी व चिखल साचलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांची विशेषत: दुचाकीस्वाराची मोठी गैरसोय होत आहे. खड्ड्यात आदळून एखादी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आहे. भोसरी, मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी भागातील अंतर्गत रस्त्यांची सतत पडणाऱ्या पावसामुळे दुरवस्था झाली आहे. अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी छोटे अन् मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज घेत वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. बहुसंख्य रस्त्यांवर जलवाहिनी, विद्युत वाहिनी, केबल आदी टाकण्याच्या कामासाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली आहे.
धावडेवस्ती, लांडेवाडी, चऱ्होली, डुडुळगाव, चक्रपाणी वसाहत, भोसरी-दिघी रस्त्यावर चिखलाने अक्षरशः राडा झाला आहे. पावसामुळे सखल भागात तळी साचली आहेत. त्यामुळे वाहतूक देखील संथगतीने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शास्त्री चौक ते चक्रपाणी वसाहत रस्ता चिखलमय झाल्याने पादचारी तसेच दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा आहे. या रस्त्यावर बाजारपेठ तसेच शाळा, कॉलेज असल्याने रहदारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दापोडी शितळा देवी चौक बुद्धविहार ते वि. भा. पाटील पुल पिंपळे गुरव महाराजा हॉटेल ते रामकृष्ण मंगल कार्यालय बोपोडी येथील रेल्वेपुला खालील सब वे वाहतूक थांबा चौक भाऊ पाटील रोड आंबेडकर चौक सेंट थॉमस चर्च औंधरोड मानाजी बाग समोरील रस्ता खडकी येथील बसस्थानक परिसर फॅक्टरी रोड मुळा रोड आदी भागातील वर्दळीच्या मार्गावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून दुचाकी घसरून अपघात होत आहेत.
वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिंपळे गुरव अशोक हॉटेल ते स्मशानभूमीपर्यंतच्या मार्गावरील पथदिवे काही दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. बोपोडी रेल्वे पुलाखालील रस्त्यावर गुडघाभर पाण्याचे तळे साठल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. याठिकाणी दुचाकीस्वार घसरुण पडण्याचे प्रकार घडले.
शहरातील विविध भागातील रस्त्यांवरील 151 खड्ड्यांची छायाचित्रे पालिकेस प्राप्त झाली. ती छायाचित्रे त्याच दिवशी क्षेत्रीय कार्यालय, स्थापत्य व बीआरटी विभागाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली. या पाठविलेल्या तक्रारींवर त्यावर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी कारवाई होऊन संबंधित खड्डा दुरुस्ती केली जात आहे.
– निळकंठ पोमण, मुख्य संगणक अधिकारी, महापालिका.