माण पंचायत समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर

उपसभापतींवरील अविश्वास ठराव नामंजूर

गोंदवले – माण पंचायत समितीच्या सभापती सौ. कविता जगदाळे यांच्यावरील अविश्वास ठराव 8 विरुद्ध 2 मतांनी सोमवारी मंजूर करण्यात आला; परंतु उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावरील अविश्वास ठरावावरील मतदान प्रक्रियेदरम्यान राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव 2 विरुद्ध 8 अशा मतांनी नामंजूर करण्यात आला.

माण पंचायत समितीच्या सभापती सौ. कविता जगदाळे व उपसभापती तानाजी कट्टे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. विकासकामात अडथळे आणतात.अरेरावीची भाषा वापरतात, ही कारणे देत उर्वरित आठ सदस्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सभापती व उपसभापती यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला होता. त्यावर दहिवडी येथे पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी दुपारी 12 वाजता पीठासन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत अविश्वास ठरावावरील मतदान प्रक्रिया झाली. सूर्यवंशी यांना गटविकास अधिकारी एस. बी. पाटील यांनी सहकार्य केले. पाटील यांनी प्रस्तावाचे वाचन केल्यानंतर सौ. कविता जगदाळे यांच्याविरोधातील ठरावावर मतदान घेण्यात आले.

उपसभापती तानाजी कट्टे, सदस्य रमेश पाटोळे, नितीन राजगे, तानाजी काटकर, सौ. अपर्णा भोसले, सौ. लतिका वीरकर, सौ. रंजना जगदाळे, सौ. चंद्राबाई आटपाडकर या सर्वपक्षीय सदस्यांनी हात वर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. स्वत: सौ. जगदाळे व विजयकुमार मगर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. अविश्वास ठराव देणाऱ्या सदस्यांसोबत असलेल्या मगर यांनी मतदानावेळी माघार घेत सौ. जगदाळे यांची बाजू घेतली.

उपसभापती तानाजी कट्टे यांच्यावर ज्या सदस्यांनी अविश्वास ठराव प्रस्ताव सादर केला होता, त्यातील एक सदस्य सोडून इतरांनी ठरावाच्या विरोधात हात वर करून मतदान केले. त्यामुळे कट्टे यांच्याविरोधातील ठराव नामंजूर झाला. दरम्यान, ठरावावर ज्यांच्या सह्या नाहीत, त्यांचे मत ग्राह्य धरले जाणार का, अशी शंका सौ. जगदाळे यांनी पीठासन अधिकाऱ्यांकडे उपस्थित केली. त्यावर, सदस्य म्हणून त्यांना मत देण्याचा अधिकार असल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेदरम्यान दहिवडीचे सपोनि आर. पी. भुजबळ यांनी पंचायत समितीच्या आवारात पुरेसा बंदोबस्त ठेवला होता.

सत्तेच्या लालसेपोटी विरोधकांशी अभद्र युती
विरोधकांनी पोलिसांना हाताशी धरून मला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी माझ्यासह कार्यकर्त्यांवर पानवण प्रकरणात खोट्या केसेस दाखल केल्या. आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेत अडकवत, पंचायत समितीत सत्तेपासून दूर ठेवायचा डाव टाकला. पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलाविरोधात जाऊन, सत्तेच्या लालसेपोटी सदस्यांनी अभद्र युती केली. आमच्या सभापतींवर अविश्वास ठराव आणून मोठा विजय मिळविल्याच्या भ्रमात या सदस्यांनी व त्यांच्या नेत्यांनी राहू नये. “क्‍यों की पिक्‍चर अभी बाकी है’, येत्या काळात जनताच त्यांना धडा शिकवेल.

  • शेखर गोरे, युवा नेते शिवसेना, माण-खटाव

हुश्‍शार उपसभापती
सर्वपक्षीय आठ सदस्यांनी उपसभापती तानाजी कट्टे यांच्याविरोधातही अविश्वास ठराव प्रस्ताव दाखल केला होता; परंतु कट्टे भलतेच “हुश्‍शार’ निघाले. आपल्यावरही अविश्वास ठराव प्रस्ताव आलाय म्हटल्यावर, तेच सर्वपक्षीय सदस्यांना जाऊन मिळाले. त्यामुळे इतर सदस्यांनी उपसभापतींवर केलेली टीकाटिप्पणी विसरून त्यांच्याच बाजूने कौल दिला. त्यामुळे कट्टेंचे पद अबाधित राहिले. त्यामुळे उपसभापतिपदासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले होते, त्यांचे काय होणार, हा प्रश्नच आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.