वॉशिंग्टन – जम्मू-काश्मीरबाबतच्या अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे अमेरिकेने बुधवारी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये 4 जी मोबाइल इंटरनेट पुन्हा सुरू झाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण आणि मध्य आशिया ब्यूरोने स्वागत केले. त्या पार्श्वभुमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पत्रकारांना हे स्पष्टिकरण दिले.
भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये 4 जी मोबाइल इंटरनेट पुन्हा सुरू झाल्याचे आम्ही स्वागत करतो. स्थानिक रहिवाशांसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य स्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी चालू असलेल्या राजकीय आणि आर्थिक प्रगतीची आम्ही अपेक्षा करतो, असे ट्विट या ब्युरोने केले होते. दिड वर्षापूर्वी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला होता. तेंव्हापासून जम्मू काश्मीरमधील मोबाईल इंटरनेट बंद केले गेले होते.
भारत-पाकिस्तान संघर्ष वाढण्यापासून रोखणे हे दक्षिण-आशियातील अमेरिकेचा दीर्घकाळापासून ध्येय आहे. अमेरिकेने कोणत्याही पक्षाला अनुकूल अशी कृती टाळण्याचा प्रयत्न केला आहे, असाच याचा अर्थ आहे.
मात्र गेल्या दशकात, अमेरिकेची भारताशी जवळीक वाढली आहे, तर पाकिस्तानवर अविश्वास दाखवला आहे, असे अमेरिकेच्या कॉंग्रेसने 2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालातच म्हटले आहे. अमेरिकेच्या या धोरणात कोणताही बदल न झाल्याचे स्पष्टिकरण हे भारतासाठी अमेरिकेची भूमिका अनुकूल असल्याचेच समजले जात आहे.