कर्नाटकात 18 दिवसांनंतरही मंत्रिमंडळाची स्थापना नाही

भाजप सरकार बरखास्त करण्याची कॉंग्रेसची मागणी

बंगळूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या घटनेला 18 दिवस लोटले. मात्र, अजूनही राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्याची दखल घेऊन राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकमधील भाजप सरकार बरखास्त करावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

येडियुरप्पा यांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतरही मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. मंत्र्यांअभावी येडियुरप्पा सरकार वन-मॅन शो बनले आहे. कर्नाटकला पुराने तडाखा दिल्याने मंत्रिमंडळ रचना रखडली आहे.

आता त्यावरून कॉंग्रेसने येडियुरप्पा सरकारला घेरतानाच राज्यपालांनाही लक्ष्य केले आहे. त्याबाबत येथे पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते व्ही.एस.उगराप्पा म्हणाले, कर्नाटकात घटनेनुसार सरकार आहे का हे मी राज्यपालांना विचारू इच्छितो. केवळ मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ म्हणता येऊ शकत नाही.

कर्नाटकमध्ये गंभीर पूरस्थिती असताना मंत्रिमंडळ असण्याची गरज आहे. तातडीने निर्णय घेण्यासाठी विविध खात्यांच्या मंत्र्यांचा उपयोग होतो. राज्यात मोठा पेच उभा आहे. आणखी काही दिवस आम्ही मंत्रिमंडळ स्थापनेची प्रतीक्षा करू. अन्यथा, कायदेशीर मार्गांचा अवलंब आम्हाला करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)