उद्योगनगरीत सात वर्षांपासून नवीन ग्रंथालयाची वानवा

मंजुरी नाही : सोशल मीडियाचा अतिवापर “वाचन संस्कृती’साठी मारक

पिंपरी – संपूर्ण राज्यात उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मागील सात वर्षापासून एकही नवीन ग्रंथालय उघडलेले नाही. राज्य शासनाने ग्रंथालयांना मंजुरी देणेच बंद केलेले असल्याने वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियाचे वारे जोरात वाहत असताना ग्रंथालयांची संख्या कमी होत असून “वाचन संस्कृती’ वर मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, सध्या तरी अस्तित्वात असलेल्या ग्रंथालयांच्या ग्रंथसंपदा वाढीवर भर द्यावा लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून “वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकावेत, सशक्‍त भारत व्हावा, यासह अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शहरातील शाळा, महाविद्यालयात हा दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “वाचन प्रेरणा दिन’ साजरा करताना ज्या ग्रंथालयामध्ये पुस्तके, ग्रंथ, कादंबऱ्यांचा खजिना असतो, त्या ग्रंथालयालाच मागील सात वर्षांपासून मंजुरी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे, सोशल मीडियाच्या जमान्यात लुप्त होत असलेली वाचन संस्कृती वाढणार कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील शासकीय ग्रंथालयासह इतर ग्रंथालयात येणाऱ्या युवकांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रंथालयात युवक विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यासाठी, वाचनालयात त्यांना सोयी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र, “अ’ “ब’ वर्गवारीतील ग्रंथालय वगळता इतर ग्रंथालयामध्ये मुबलक पुस्तके, ग्रंथासह इतर साहित्य, सोयी-सुविधाचा अभाव प्रकर्षाने दिसतो. पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील ग्रंथालयाची तर यापेक्षाही बिकट अवस्था आहे.

साहित्याचा अभाव, सोयी-सुविधांचा अभाव, मिळणारे अपुरे अनुदान अशा अनेक समस्या या ग्रंथालयासमोर आहेत. त्यामुळे, दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात “वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला, मात्र, ग्रंथालये समृध्द करण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रंथालये समृध्द झाली तरच सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या युवकांसह ज्येष्ठांची पावले ग्रंथालयांकडे वळणार आहेत, चांगल्या साहित्याच्या वाचनाने समाजही खऱ्या अर्थाने समृध्द होण्यास मदत होणार आहे.

केवळ 30 हजारांचे अनुदान
ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनूसार अनुदान मिळत असते. “ड’ वर्गवारीमध्ये असलेल्या ग्रंथालयांना केवळ 30 हजार रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानातूनच ग्रंथालय चालकांना पुस्तक खरेदी, इमारत भाडे, कर्मचाऱ्यांच्या पगारीसह सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतात. शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानामुळे ग्रंथालये समृध्द कशी होणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)