नवी दिल्ली – चीन आणि भारतात दरम्यान सरहद्दीवर चकमकी होत आहेत. अशा परिस्थितीत चिनी वस्तूच्या आयातीवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असा निर्णय घेणे अयोग्य आहे, असे नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी म्हटले आहे.
भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावली असून भारताचा यावर्षी विकासदर 7% होणार आहे. हा विकासदर वाढता ठेवण्यासाठी चीनकडून आयात करणे गरजेचे आहे. जर चीनकडून आयात थांबविली तर भारताच्या विकास दरावर परिणाम होऊ शकतो असा इशारा त्यांनी दिला.
सध्याच्या परिस्थितीत चीनकडून आयात कमी केली तर भारतात अनेक आवश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. भारतातील विविध क्षेत्रांमध्ये चीनकडून आलेल्या सुट्या भागाचा वापर केला जातो. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सेमी कंडक्टरचा समावेश आहे.
जगाबरोबर भारताची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.
अशा परिस्थितीत चीनबरोबर आर्थिक विविध सुरू केले तर ते आपल्याला महागात पडेल. आपण विकासदराचा बळी दिल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. नऊ डिसेंबर रोजी तवांग येथे भारतीय लष्कर आणि चिनी लष्करादरम्यान चकमक झाली. त्यानंतर देशात चीनविरोधात वातावरण निर्माण झाले असून दिल्लीत व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूची होळी केली आहे.
व्यापार युद्धाचा उपयोग नाही –
भारताची अर्थव्यवस्था केवळ तीन लाख कोटी डॉलरची ( ट्रिलीयन) आहे. तर चीनची अर्थव्यवस्था तब्बल 17 लाख कोटी डॉलरची आहे. भारताने चीनबरोबर व्यापार युद्ध केले तर त्यात भारताचेच नुकसान होणार आहे. चीनपेक्षा बलाढ्य असलेल्या अमेरिकेने चीन बरोबर आतापर्यंत व्यापार युद्ध टाळले आहे. भारताला आवश्यक वस्तू चीनकडून सर्वात कमी किमतीत मिळतात. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होतो असे ते म्हणाले.