आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण : इंदुरीकरांचा तो व्हिडिओ सापडत नाही
नगर – पुत्रप्राप्तीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांना जिल्हा आरोग्य विभागाने दिलासा दिला आहे. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओच यू ट्यूबवर सापडत नाही. त्यामुळे पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई करता येणार नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी एका प्रवचनात केल्याचा आरोप आहे. नगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीएनडी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती. इंदुरीकरांच्या वक्तव्याची शहानिशा करण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांना सांगितले होते.
पोलिसांच्या तपासाचा अहवाल आला असून असा कोणताही व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या सायबर सेलने आरोग्य विभागाला कळवलं आहे. सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी आज ही माहिती दिली. ज्या वर्तमानपत्रात या बाबतची बातमी आली होती, त्यांनाही नोटीस पाठवून खुलासा मागविला होता. मात्र, तो अद्याप आला नाही.
त्यामुळे त्यांना पुन्हा पत्र पाठविण्यात येत असल्याचे मुरंबीकर यांनी सांगितले. जोपर्यंत ठोस पुरावे येत नाहीत, तोपर्यंत इंदुरीकरांवर काहीही कारवाई करता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंदुरीकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
इंदुरीकर यांनी यापूर्वीच आरोग्य विभागाकडे आपली बाजू मांडली आहे. असे कोणतंही वक्तव्य केलंच नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचा हा खुलासा समाधानकारक वाटत असल्याचे आरोग्य विभागाने आधीच स्पष्ट केले होते. आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे आरोग्य विभागाने आपली भूमिका मांडली आहे.