पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 21 मार्च रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
राज्यातील एकूण 378 केंद्रांवर इयत्ता आठवीसाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 8 हजार 612 शाळांमधील 97 हजार 526 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. प्रवेशपत्रांबाबत सूचना जारी केली आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.
शाळा लॉगिनमधून प्रवेशपत्रे काढून देण्याची जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधीत परीक्षा केंद्रसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.