मार्केझ प्रमुखांच्या अटकेपेक्षा त्यांचे विलगीकरण करणार : पोलिस

नवी दिल्ली : निझामुद्दिन मार्केझचे प्रमुख मौलाना महंमद साद यांच्यावर निजामुद्दिन येथील मेळाव्यासाठी एफआयआर नोंदवण्यात आला असला तरी ते सापडल्यास त्यांना अटक करण्यात येणार नाही, असे दिल्ली पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केले. फरार झालेल्या या प्रमुखांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवल्याचे जाहीर केले असले तरी पोलिसांनी त्यांना अटक करण्याऐवजी विलगीकरणात ठेवण्यात येईल, असे म्हटले आहे.

तब्लिघी जमातच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात किमान नऊ हजार जण सहभागी झाले होते. भारतात कोरोनाचा प्रसार होण्यात हा मेळवा महत्वाचा स्रोत ठरल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पोलिसांनी साद यांना पाठवलेली नोटीस मिळाली असून त्याला उत्तर देण्यासाठी कालावधी मागून घेतला आहे. या मेळाव्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी मागितली असून लॉक डाऊनमुळे कार्यालय आणि विभाग बंद असल्याने पोलिसांकडे मुदत मागितली आहे, असे साद यांच्या वकिलांनी सांगितले.

तब्लिघी जमातचे कार्यकर्ते आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 22 हजार जणांचे विलगीकरण करण्याचे प्रयत्न युध्द पातळीवर सुरू आहेत. सध्या 17 राज्यांत तब्लिघी जमातशी संबंधित कोरोना बाधीतांची संख्या 1023 वर पोहोचली आहे. देशातील बाधितांच्या संख्येपैकी 30 टक्के बाधित हे या घटनेशी संबंधित आहेत, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.