नवी दिल्ली – भारतात बलात्काराच्या आरोपानंतर 17 हजार कोटी रूपये घेउन विदेशात परागंदा झालेला स्वामी नित्यानंद याने आणखी एक संदेश जारी केला आहे. त्यानुसार ‘हिंदू रिझर्व्ह बॅंक’ आणि आपले स्वत:चे चलन सुरू करणार असल्याची घोषणा त्याने केली आहे.
भारतातून फरार झाल्यानंतर नित्यानंद याने दक्षिण अमेरिकेत ‘कैलासा’ नावाचा स्वतंत्र देश स्थापन केल्याचे जाहीर केले होते. त्याच्या या घोषणेनंतर अनेक स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्थांचे जाळे त्याच्या पाठीशी असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
नित्यानंद प्रकरणात भारतातील एका प्रख्यात माध्यम समूहाने लक्ष घातले होते व त्याच्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार अमेरिका, आशिया आणि ब्रिटनमधील अनेक संघटना नित्यानंद याच्याशी संबंधित असल्याची नवी माहिती समोर आली आहे. या संघटनाच नित्यानंदचा कथित देश कैलासा आणि त्याची नवी बॅंक आणि त्याच्या चलनाचा मुलाधार असल्याचे समोर येत आहे.
नित्यानंदने अलिकडेच एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामूत पैसा जमवला जाण्याचे सूतोवाच केले होते. कैलासासाठी जगभरातून लोक दान करत असून स्थानिक सरकारांशी जोडलेली ही मंडळी आहेत.