पाटना – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल ( bihar election 2020 ) आज जाहीर होणार आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजप-जेडी(यु) यांची एनडीए आघाडी बहुमताजवळ पोहोचताना दिसतीये. राजद-काँग्रेस यांच्या महाआघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सद्वारे वर्तविण्यात आला होता. मात्र सद्य परिस्थितीनुसार बिहारमध्ये यंदाही एक्झिट पोल्स फोल ठरतील असंच चित्र पाहायला मिळतंय.
दरम्यान, एनडीएला जरी बहुमत मिळत असल्याचं चित्र असलं तरी यातील प्रमुख घटक पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या जेडी(यु)चा परफॉर्मन्स मात्र कमालीचा घसरलाय. आघाडी घेतलेल्या उमेदवारांच्या संख्येबाबतीत सध्या भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून जेडी(यु)ची घसरण थेट तिसऱ्या क्रमांकावर झाली आहे. आकडेवारीनुसार तेजस्वी यादव यांचा राजद सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
निवडणूक जाणकारांच्या मते, नितीश कुमार यांच्या जेडी(यु)च्या या वाताहतीमागे लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांची खेळी आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या लोजपने आघाडीतून बाहेर पडत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात दंड थोपटले होते. निवडणुकांच्या रणधुमाळीत चिराग पासवान एकीकडे भाजपची स्तुती करताना तर दुसरीकडे नितीश कुमारांविरोधात गंभीर आरोप लगावताना दिसले.
लोजपने आखलेली निवडणूक रणनीती देखील नितीश कुमारांना उपद्रवी ठरेल अशीच आखण्यात आल्याचे दिसले. दलित व्होटर बेस असलेल्या या पक्षाने यंदा बहुतांश उमेदवार कथित सवर्ण समाजातील व स्थानिक राजकारणावर चांगली पकड असलेले उतरवल्याचे पाहायला मिळाले.
यानंतर राजकीय जाणकार व काही भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांनी, भाजपच चिराग पासवान यांचा उपयोग नितीश कुमारांच्या जेडी(यु)ला कमकुवत करण्यासाठी करत असल्याचा गंभीर आरोप लगावला होता. अशातच आता निवडणुकांचे कल हाती येत असताना एकीकडे जेडी(यु)चे संख्याबळ घटताना दिसत असले तरी दुसरीकडे भाजप बिहारचा प्रमुख पक्ष म्हणून उदयास येताना दिसतोय.
एनडीटीव्ही या नामांकित वृत्तसंकेतस्थळाने निवडणूक आकडेवारीच्या आधारावर दिलेल्या वृत्तामध्ये, ‘नितीश कुमार यांच्या जेडी(यु)ला जर पासवान यांच्या लोजपच्या उमेदवारांचा सामना करावा लागला नसता तर जेडी(यु) बिहार निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला असता.’ असे आकलन करण्यात आले आहे.