लातूरच्या नितिशाचे यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून देशात पहिला क्रमांक बिहारच्या शुभम कुमारने मिळविला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 100 हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले. यातच मूळची लातूरची असणारी नीतिशा जगतापने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश संपादन केले आहे. तिची 199 रॅन्क आहे. महत्वाचे म्हणजे नीतिशा जगताप ही केवळ 21 वर्षाची आहे. त्यामुळे तिने मिळवलेल्या यशावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नीतिशा जगतापने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून सायकॉलॉजी या विषयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच नीतिशाने यूपीएससीचा नियोजनबद्ध अभ्यास सुरु केला. आपण यूपीएससी करायची असे बारावी पासूनच ठरवल्याचे नितिशाने सांगितले.

नितिशाने आपली यूपीएससीची तयारी पुण्यात राहून केली. तिने युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. सुरुवातीपासून नितिशा अभ्यासामध्ये हुशार असून तिला अभ्यास कर असं कधी सांगायची वेळ आली नसल्याचं नितिशाची आई अश्विनी जगताप यांनी सांगितले. नितिशाचे वडील संजय यांनीही नितिशा पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणार असल्याचा विश्वास होता असे सांगितले.

नितिशाला अजून तरी सर्व्हिस अॅलॉट झाली नाही. पण आयएएस हे आपले पहिले प्राधान्य असल्याचे नितिशाने सांगितले. या सर्व्हिसचा उपयोग गरजू लोकांच्या विकासासाठी करणार असल्याचे नितिशाने सांगितले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.