नितीश कुमार यांनी दाखवला इंगा; चिराग पासवान यांच्या पक्षाला खिंडार

पाटणा – राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहुनही बिहार विधानसभा निवडणुकीत नीतीश यांचा शक्तीपात करण्याचे पुण्यकर्म लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी केले. त्यांनी या निवडणुकीत भाजप या रालोआतील प्रमुख पक्षाबद्दल अवाक्षरही न काढता नीतीश यांना जेरीस आणले होते. त्याची परिणती म्हणजे बिहारमध्ये नीतीश पुन्हा मुख्यमंत्री तर झाले, पण राज्यातील त्यांची ताकद निम्म्याने कमी झाली. आता भाजपचा धाकटा भाउ म्हणून त्यांच्या संयुक्त जनता दलाला राज्याचा कारभार करावा लागतो आहे.

सुशासन बाबू अशी प्रतिमा असलेली नीतीश धुरंदर आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे नेते म्हणूनही ओळखले जातात. निवडणुकीच्या निकालानंतर इतके दिवस शांत राहील्यावर अखेर त्यांनी चिराग यांना जोरात झटका दिला आहे. त्यांच्या पक्षाला मोठे खिंडार पाडून आपली ताकद दाखवून दिली आहे. पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या 18 जिल्हाप्रमुख आणि पाच प्रदेश सरचिटणीसांसह 208 नेत्यांनी चिराग यांना रामराम करत आता नीतीश यांच्या पक्षाची वाट धरली आहे.

दरम्यान, चिराग यांना बसलेला हा काही पहिला हादरा नाही. यापूर्वी जानेवारी महिन्यातही त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. तेव्हा 27 जणांनी सामूहिक राजीनामा देत चिराग यांना सोडचिठ्ठी दिली होती. जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीसांसह तब्बल 208 नेत्यांनी एकाचवेळी पक्षाला रामराम ठोकणे ही बिहारच्या राजकारणातील आजवरची सगळ्यांत मोठी बंडखोरी मानली जाते आहे.

संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर सी पी सिंह यांच्या उपस्थितीत जनता दलाच्या मुख्यालयात झालेल्या समारोहात लोजपच्या या नेत्यांनी जनता दलात प्रवेश केला. यावेळी जनता दलाचे उपाध्यक्ष उमेश कुशवाह, महेश्‍वर हजारी आणि गुलाम रसूल बलियावी यांच्यासारखे बडे नेतेही उपस्थित होते.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत लोजपने जनता दलाला धक्का दिला असला तरी पक्षाला खातेही उघडता आले नाही. आपल्याला काही जागा मिळाल्या की भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत सत्तेत सहभागी व्हायचे असा चिराग यांचा प्लॅन होता. मात्र त्यांच्या पक्षाला मते मिळाली असली तरी जागा मिळाल्या नाहीत. तेव्हापासून या पक्षाच्या नेत्यांची चलबिचल सुरू होती. अखेर आज पक्षात सगळ्यांत मोठी फूट पडली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.