नवी दिल्ली : जनता दल युनायडेटच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून दावेदारी सांगण्यात येत होते. मात्र आता या प्रकरणात पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जदयूचे राष्ट्रीय महासचिव के.सी. त्यागी यांनी यासंदर्भात भाष्य करताना नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची योग्यता आहे. मात्र ते पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नसले तरी त्यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण असल्याचे म्हटले आहे. राजीव रंजन यांच्या याच वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळामध्ये सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या जदयू आणि भाजपा युतीमध्ये काहीतरी बिघडले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर त्यागी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यागी यांनी, नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नाहीत. आमचा पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) एक मबजूत घटक पक्ष असून एनडीएचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जेडीयू ही राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत असल्याचे त्यागी यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण आहेत. मात्र पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि पंतप्रधान पदासाठी दावा करणे या दोघांमध्ये फार अंतर आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम असेल त्यांना मी हे सांगू इच्छितो की आमच्या नेत्यामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, असे ललन सिंह म्हणाले होते. त्यानंतर जदयू आणि भाजपाच्या मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.