बिहार बालमृत्यू प्रकरणी भाजप नेत्याचा नितीश कुमारांवर निशाणा

पाटणा – बिहारमध्ये सध्या ‘चमकी’ (ऍक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोम) तापाने थैमान घातले असून या जीवघेण्या आजाराने आतापर्यंत राज्यातील जवळपास १०० बालकांचा बळी घेतला आहे. बिहारमधील रुग्णालयांमध्ये चमकी तापाच्या आणखी अनेक बालरुग्णांवर उपचार सुरु असून सध्या राज्यात ही साथ वेगाने पसरत असल्याने बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू-भाजप आघाडी सरकार समोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

अशातच आता भाजपचे जेष्ठ नेते आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर सी पी ठाकूर यांनी बिहार सरकार आणि नितीश कुमार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. एका पत्रकार परिषदेमध्ये बिहारमधील बालमृत्यूबाबत बोलताना सी पी ठाकूर यांनी, “जेव्हा राज्यात अशाप्रकारची परिस्थिती उद्भवते त्याच वेळी सरकारला जाग येते मात्र वेळीच प्रतिबंधक उपाययोजना राबवून परिस्थिती उद्भवूच नये याबाबत प्रयत्न केले जात नाहीत.” असा आरोप लावला.

यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारला अशी परिस्थिती भविष्यात उद्भवु नये यासाठी योग्य ते संशोधन करावे असे देखील सुचवले. बिहारमधील चमकी तापाची साथ लिची हे फळ खाल्ल्याने उद्भवल्याचे बोलले जात असून असे असेल तर याबाबत उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात यावी असं देखील ठाकूर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.