नितीश कुमार यांनी भाजप आणि संघाला सोडून….; काँग्रेसकडून ऑफर

नवी दिल्ली – सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत सत्ता काबीज करण्यासाठी कॉंटे की टक्कर पहावयास मिळाली. एनडीएने थोड्या जागांच्या फरकाने विरोधकांच्या महाआघाडीला मागे टाकत बहुमताचा आकडा पार केला. यामध्ये जेडीयूला कमी जागा मिळाल्या असल्या तरीही बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेणार आहेत. अशातच नितीश कुमार यांना काँग्रेसने ऑफर दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हंटले कि, भाजप आणि संघ अमरवेलीसारखे आहेत. ज्या झाडाला वेढतात ते वाळून जाते. नितीशजी लालू यांनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले आहेत. भाजप आणि संघाच्या विचारधारेला सोडून तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्या. या अमरवेलीरुपी भाजप आणि संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका, असा सल्लाही त्यांनी नितीश कुमार यांना दिला आहे.

नितीशजी, बिहार आपल्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात यावे. सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवणारे लोकांचे एकमत करण्यासाठी मदत करावी. संघाची इंग्रजांद्वारे ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीला रुजू देऊ नका. विचार नक्की करा, असेही दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमारांना सांगितले आहे.

हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति श्रद्धांजली ठरेल. आपण त्यांच्याच वारसाातून जन्माला आलेले राजकारणी आहात. तिथे परत या. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, जनता पार्टी संघाच्या दुहेरी भूमिकेमुळेच फुटली होती. भाजपा, संघाला सोडा आणि देशाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा, असे आवाहनदेखील दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना केले आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून एनडीएला बहुमत मिळाले आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. तर, महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.