नवी दिल्ली : बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमधील पंचायती राज मंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) चे नेते कपिलदेव कामत यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. गुरुवारी (15 ऑक्टोबर) रात्री उशिरा पाटण्यातील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांना कित्येकदिवसापासून मुत्रपिंडाचा आजार होता आणि त्यातच त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र काल(गुरुवारी) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, “कपिलदेव कामत हे मातीशी आणि मातीतल्या माणसाशी जोडलेले एक नेते होते. ते मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. ते कुशल प्रशासक आणि लोकप्रिय राजकारणी होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी खंत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रकृतीचा विचार करता जेडीयूने त्यांची सून मीना कामत यांना मधुबनी जागेसाठी उमेदवारी दिली आहे.
कपिलदेव कामत यांचा अल्प परिचय…
कपिलदेव कामत मधुबनी जिल्ह्यातील बाबूबरही मतदारसंघातून जनता दल युनायटेडचे आमदार होते. तसेच बिहार सरकारमध्ये त्यांच्यावर पंचायती राज मंत्रालयाची जबाबदारी होती. कामत हे नितीशकुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते 10 वर्ष मंत्री होते. गेली 40 वर्षे ते राजकारणात सक्रिय होते.