मुजफ्फरपूर – बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या उंबरठ्यावर मतदार असताना अनेक ठिकाणी विद्यमान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात हमरी-तुमरीचे राजकारण होत आहे. अशाच एकाप्रचारसभेनंतर मुजफ्फरपूरमध्ये व्यासपीठावरून मुख्यमंत्री नितीशकुमार उतरताच काही तरुणांनी “नितीशकुमार मुर्दाबाद’ अशी नारेबाजी केली.
यावेळी गर्दीतील एकाने नितीशकुमार यांच्या दिशेने चप्पलही भिरकावली. त्यानंतर त्वरेने हालचाल करत मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
मुजफ्फरपूरमध्ये दोन दिवसांपूर्वीही मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सभा झाली होती. त्या सभेतही “नितीशकुमार मुर्दाबाद’, अशी नारेबाजी केली गेली होती. यावेळी नितीशकुमार यांनी नारेबाजी करणाऱ्यांना सुनावलं. “जो जिंदाबाद आहे, त्याची सभा ऐकण्यासाठी जा’, असं नितीशकुमार म्हणाले. बिहारमध्ये आपली पुन्हा सत्ता आल्यास राज्यात 24 तास वीजपुरवठा होईल.
प्रत्येक घरात सौर पथदिवे असतील. स्वच्छतेबरोबरच तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन नितीशकुमार यांनी मतदारांना दिलं. मात्र, काही तरुणांनी आरडाओरडा करत, घोषणाबाजी करत या सभेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.