BCCI Medical Team Head Nitin Patel Resign : नितीन पटेल यांनी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाचा राजीनामा दिला आहे. नितीन पटेल हे बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (पूर्वीचे एनसीए) येथे क्रीडा विज्ञान आणि औषध संघाचे प्रमुख होते. जवळजवळ तीन वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर नितीन यांनी राजीनामा दिला आहे. अनेक खेळाडूंना दुखापतीतून सावरण्यास मदत करण्यात नितीन यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि केएल राहुल सारखे खेळाडू देखील आहेत. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला पुष्टी दिली की एनसीएच्या सर्वात वरिष्ठ कर्मचाऱ्यांपैकी एक असलेल्या नितीनने खरोखरच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नितीन पटेल यांचे कुटुंब राहते परदेशात –
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, हो, नितीन यांनी क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय पथकाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नितीन यांचा बीसीसीआयमध्ये खूप चांगला कार्यकाळ होता. एनसीएमध्ये क्रीडा विज्ञान आणि वैद्यकीय संघ स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही वर्षातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू दुखापतीनंतर उपचारासाठी येथे येत असे, तेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याला खेळण्याची परवानगी दिली जात असे. नितीन यांचे कुटुंब परदेशात राहते आणि सीओईचा क्रीडा विज्ञान आणि औषध विभाग चालवणे हे वर्षातील ३६५ दिवसांचे काम आहे.
BCCI Suffers Major Blow As Nitin Patel, Head Of Sports Science Wing Set To Exit pic.twitter.com/Fjxlf36x8X
— CricAsh (@ash_cric) March 14, 2025
कोणत्या खेळाडूंच्या पुनर्वसनात बजावलीय महत्त्वाची भूमिका?
नितीन पटेल यांनी आपल्या कार्यकाळात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी, फलंदाज केएल राहुल आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यासारख्या प्रमुख खेळाडूंच्या पुनर्वसनात महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्रांनी सांगितले की, काही लेव्हल थ्री प्रशिक्षक आणि ‘स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग’शी संबंधित काही प्रशिक्षक पुढील काही महिन्यांत आपले पद सोडू शकतात. एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा कार्यकाळ या वर्षाच्या अखेरीस संपणार आहे. परंतु, २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत त्यांना त्यांच्या पदावर राहण्याची विनंती केली जाऊ शकते.
बरेच लोक देत आहेत राजीनामा –
पटेल यांच्याआधी, एनसीएशी संबंधित प्रशिक्षकांपैकी एक, साईराज बहुतुले यांनीही पद सोडले होते आणि ते राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाले होते. एवढेच नाही तर, सीतांशू कोटक हा कायमचा वरिष्ठ पुरुष संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सामील झाला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाशी संबंधित असलेले एनसीए प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर अजूनही सीओईमध्ये आहेत, परंतु पुढील वर्षी झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनंतर ते त्यांच्या पदावर कायम राहतील का हे पाहणे मनोरंजक असेल. काही विशेषज्ञ फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहेत, जे येत्या काही महिन्यांत नवीन करिअरच्या शोधात आपले पद सोडू शकतात.