मुंबई – आपल्या धडक कारवाईसाठी समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगावकर यांना आज मुंबई पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. मात्र नांदगावकर यांना अटक केल्यानंतर त्यांचा जमीन मंजूर करण्यात आल्याने त्यांची तात्काळ सुटका करण्यात आली. सध्या शिवसेनेत असलेले नितीन नांदगावकर हे समाज माध्यमांवर आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असून त्यांनी याआधी देखील अनेकांना अशाच प्रकारे चोप दिला आहे.
नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी महिलांची छेड काढत असल्याचा आरोप असलेल्या रझीउर रहमान हबीबुर रेहमान खान यास आपल्या कार्यालयामध्ये बोलावून विवस्त्रकरत चोप दिला होता. खान यास चोप देतानाच व्हिडीओ देखील नांदगावकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील खात्यावर प्रसारित केला होता. यानंतर खान याने नांदगावकर व त्यांचा साथीदार दर्शनबीरसिंग सुरजीतसिंग कोचा यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
काय आहे महिला छेडछाड प्रकरण?
रझीउर रहमान हबीबुर रेहमान खान याच्यावर माटुंगा रेल्वे स्थानकानजीक महिलांची छेड काढल्याचा आरोप असून त्याबाबतचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली होती.