पिंपरी – लाच प्रकरणात अटक झालेले महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे भाजपच्या दृष्टीने निर्दोष आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून ते दोषी आढळल्यावर पक्ष योग्य ती कारवाई करेल, असे स्पष्टीकरण सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिले आहे.
लाच प्रकरणावरून भाजपला नैतिकतेचा विसर पडला असून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील गप्प का, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली होती. त्यावरून प्रत्युत्तर देताना भाजपकडून पक्षनेते नामदेव ढाके यांनी आमच्यासाठी स्थायीचे अध्यक्ष लांडगे निर्दोष आहेत. पक्षश्रेष्ठींनी अहवाल घेतल्यानंतर सर्व माहिती जाणून घेतलेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तो तपासाचा भाग आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत. आमच्या नेत्यांना उत्तर देण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाने यामागील काळात काय केले, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असेही ढाके म्हणाले.